लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आणि जर्मनी यांनी मंगळवारी प्रमुख संरक्षण व्यासपीठ विकसित करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. तसेच, सुमारे ४३,००० कोटी रुपये खर्चून पारंपरिक विनाशक पाणबुड्यांच्या खरेदीत भारताने रस दाखविला. या योजनेवर दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची मंगळवारी चर्चा झाली.
जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांच्याशी झालेल्या चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत आणि जर्मनी सामायिक उद्दिष्टांवर आधारित संरक्षण संबंध निर्माण करू शकतात. जर्मनीला उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील संरक्षण कॉरिडॉरमध्ये अधिक गुंतवणूक करण्यासाठीही आमंत्रित केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी भारत-प्रशांत महासागर आणि इतर क्षेत्रांमध्ये चीनच्या वाढत्या आक्रमकतेसह प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीचाही आढावा घेतला. पिस्टोरियस चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर सोमवारी दिल्लीत दाखल झाले. १०१५ नंतर जर्मनीच्या संरक्षणमंत्र्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. पिस्टोरियस म्हणाले की, भारतीय संरक्षण उद्योग जर्मन संरक्षण उद्योगाच्या पुरवठा साखळीत सहभागी होऊन त्यात योगदान देऊ शकतो.
सहा पाणबुड्या खरेदीवर चर्चा
सुमारे ४३,००० कोटी रुपये खर्चून सहा पारंपरिक विनाशक पाणबुड्या विकत घेण्याच्या भारताच्या योजनेवरही चर्चा झाली आणि पिस्टोरियस यांनी या प्रकल्पात जर्मनीचे स्वारस्य व्यक्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कराराच्या दावेदारांपैकी एक म्हणजे जर्मनीची ‘थायसेनक्रूप मरिन सिस्टीम’ (टीकेएमएस).