नवी दिल्ली: बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाच्या स्थितीबद्दल भारताला तीव्र चिंता वाटते, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत या विषयावर स्वतःहून केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर भारताने दिलेली ही पहिली अधिकृत प्रतिक्रिया आहे.
ते म्हणाले की, बांगलादेशला लागून असलेल्या भारतीय सीमेवर लष्कराला अधिक सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, अशी भूमिका भारताने मांडली आहे. बांगलादेशमध्ये राहत असलेल्या भारतीयांच्या आम्ही संपर्कात आहोत.
बांगलादेश लष्करात फेरबदल : बांगलादेश लष्करामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. राष्ट्रीय दूरसंचार देखभाल केंद्र (एनटीएमसी) चे महासंचालक मेजर जनरल झिया उल अहसन यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. लष्कराच्या इंटर सव्हिसेस पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंटच्या (आयएसपीआर) एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.