लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारताने उत्तरेकडील सीमावर्ती हवाई तळांवर प्रगत हेरॉन मार्क-२ ड्रोन तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांद्वारे शत्रूवर हल्ला करण्यासह एकाच उड्डाणात चीन व पाकिस्तान या दोन्ही सीमांवर नजर ठेवू शकतात. यामुळे लष्कराचे सामर्थ्य वाढणार आहे. इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रिजने (आयएआय) विकसित केलेले हे ड्रोन एकाच उड्डाणात अनेक मोहिमा राबवू शकते, तसेच लक्ष ठेवू शकते.
हेरॉन मार्क-२ प्रदीर्घ काळ उड्डाणास सक्षम आहे. या क्षमतेमुळे ते मोठ्या क्षेत्रात गस्त घालू शकते. आधुनिक एव्हीओनिक्स व इंजिनमुळे त्याचा उड्डाणकाळ वाढला आहे. याशिवाय ते उपग्रह जोडणीने सुसज्ज असून, लक्ष्यावर २४ तास पाळत ठेवू शकते. हेरॉन मार्क-२ची लढाऊ विमानांनाही मदत होते. ते लक्ष्यावर लेझर प्रकाश टाकतात, त्यामुळे लढाऊ विमानांना लक्ष्य अचूकपणे टिपता येते. याशिवाय हे ड्रोन शुन्याखालील तापमानातही काम करू शकते.