नवी दिल्ली : अन्नधान्याची नासाडी करण्यात जगात चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. दरवर्षी ९० हजार कोटी रुपये किमतीच्या ६.८ कोटी टन अन्नपदार्थांचीभारतात नासाडी होते. याचा अर्थ देशातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी ५० किलो अन्न वाया घालविते. इतक्या पैशांत शीतगृह व फूड चेनची व्यवस्था झाली तर भारतातील एकाही व्यक्तीची उपासमार होणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.
चीनमध्ये दरवर्षी ९.१ कोटी टन अन्नधान्याची नासाडी होते. याबाबत भारत दुसऱ्या क्रमांकावर असून, तिसऱ्या स्थानी असलेल्या नायजेरियात ३.७ कोटी टन, त्या पाठोपाठ अमेरिकेत २ कोटी टन व इंडोनेशियात १.९ कोटी टन अन्नधान्याची बरबादी होते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या २०२१ च्या अहवालानुसार भारतामध्ये दरवर्षी ४० टक्के अन्न विवाह तसेच घरगुती समारंभ, धान्य पुरवठ्यातील त्रुटी व अव्यवस्थेमुळे वाया जाते. देशात प्रत्येक घराच्या किचनमधून अन्नधान्य, पदार्थांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. हे टाळे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)
मुंबईत रोज ६९ लाख किलो अन्न कचऱ्यात
भारतात २१०० कोटी किलो गहू दरवर्षी खराब होतो. नेमके इतक्याच गव्हाचे उत्पादन ऑस्ट्रेलियामध्ये होते. मुंबईमध्ये दरदिवशी ६९ लाख किलो अन्नपदार्थ कचरापेट्यांमध्ये फेकले जातात. इतक्या प्रमाणातील खाद्य पदार्थांत अर्ध्या मुंबईचे पोट व्यवस्थित भरू शकेल.
जगात ६९ कोटी लोक अर्धपाेटी
जगभरात दरवर्षी २.६ ट्रिलियन डॉलर इतक्या किमतीचे ९३ कोटी टन अन्न दरवर्षी वाया जाते. जगभरात ६९ कोटी लोक दररोज अर्धपाेटी असतात. २०३० पर्यंत ही संख्या ८४ कोटी होण्याची शक्यता आहे.