नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील स्थगिती 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) एका परिपत्राकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे स्थगित केल्याने मालवाहू आणि डीजीसीए मान्यताप्राप्त उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे डीजीसीएच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, विविध हवाई मार्गावरील परिस्थितीनुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मान्यता दिली जाऊ शकते, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
गेल्या महिन्यात 26 नोव्हेंबरला डीजीसीएने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या धोका लक्षात घेता पुन्हा आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील स्थगिती 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. पण, सध्या काही देशांसोबत एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात एक नवीन भीती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला चिंताजनक म्हटले आहे आणि सर्व देशांना सावध राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील स्थगितीचा निर्णय घेतला आहे. तसेच, एअर बबल अंतर्गत जारी केलेल्या उड्डाणांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. याशिवाय, जे देश जोखमीच्या श्रेणीत येतात, त्यांना तिथून येणाऱ्या प्रवाशांबाबत अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.