नवी दिल्ली, दि. 13 - अमेरिकेची अवकाश संशोधन एजन्सी नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन(नासा)ने अलिकडेच पृथ्वीची काही नयनरम्य छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या पृथ्वीच्या रात्रीच्या दरम्यान घेतलेल्या छायाचित्रात भारत अगदी उठून दिसतो आहे. 2012या वर्षीही नासानं पहिल्यांदा अंतराळातून पृथ्वीच्या घेतलेल्या छायाचित्राला नाइट लाइट्स म्हणून संबोधण्यात आलं होतं. तसेच गेल्या 25 वर्षांत प्रत्येक दशकात नासा छायाचित्र जारी करत असतेच. नासाचे संशोधकही नाइट लाइट्सचे अप्रतिम छायाचित्र रोजच्या रोज अपडेट करण्यासाठी प्रयत्नशील असतात, जेणेकरून प्रत्येक ऋतूची भविष्यवाणी समजून त्याप्रमाणे नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यात मदत मिळेल. अंतराळातून पृथ्वीच्या रात्रीच्या घेतलेल्या छायाचित्रात पहिल्यांदा 2012 या वर्षात भारताचं छायाचित्र प्रसिद्धीस देण्यात आलं होतं. त्यानंतर 2016मध्ये भारताचं दुसरं छायाचित्र प्रसिद्धीस दिलं होतं. 2012 ते 2016 या चार वर्षांत भारताची लोकसंख्या झपाट्यानं वाढल्याचं 2016ला अंतराळातून काढलेल्या छायाचित्रातून दिसतं आहे. नासाचे गोड्डार्ड स्पेस प्लाइट सेंटरचे पृथ्वी संशोधक मिगुएल रोमन या रिसर्च टीमचं नेतृत्व करत आहेत. ते अंतराळातील सर्वाधिक लांबची छायाचित्र काढण्यासाठी एक सॉफ्टवेअरही विकसित करत आहेत. 2016 या वर्षीच्या अंतराळातील भारताच्या छायाचित्रामधून चंद्राचा प्रकाश हटवण्यात आला आहे. सेटलाइटवरील व्हिजिबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर सुयट (VIIRS)च्या मिळालेल्या डेटाचा हा परिणाम आहे. नासाच्या मते, व्हीआयआयआरएस असं पहिलं सेटलाइट उपकरण आहे की, जे प्रकाशाचे उत्सर्जन तसेच सावलीचं योग्य आकलन करू शकतं. त्यामुळे संशोधकांना रात्रीच्या वेळेस दिसणा-या प्रकाशाच्या स्त्रोतांची माहिती मिळते.
(अवकाशातील 2016 या वर्षीचं भारताचं छायाचित्र)