ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 10 - भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्त्रो'ने 2008मध्ये चंद्रावर भारताचं पहिलं मानवरहित यान, चंद्रयान – 1 पाठवलं होतं. चंद्राभोवती प्रदक्षिणा घेतल्यानंतर 2009 पासून त्याच्याशी इस्त्रोचा संपर्क तुटला. अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, यामध्ये अपयश आल्यानंतर हे चंद्रयान हरवल्याचं घोषित करण्यात आलं पण, आता ते सापडलं आहे. संपर्क तुटण्याआधीच भारताच्या चंद्रयानाने चंद्रावर पाणी आहे असे सांगितले होते.
अमेरिकेची स्पेस एजन्सी 'नासा'ने चंद्रयान –1 सापडल्याचा दावा केला आहे. ते चंद्रयान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे चंद्रयान पाठवताना ते केवळ 2 वर्ष हे या मोहिमेवर राहील अशी योजना आखण्यात आली होती. पण नासाने ते यान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचं सांगितलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून 200 किमी दूर अंतरावर हे चंद्रयान एका कक्षेत आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हे यान शोधण्यासाठी इंटर प्लानेटरी रडारचा वापर करण्यात आला. या रडारचा उपयोग लघुग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो.
22 ऑक्टोबर 2008 मध्ये श्री हरीकोटा येथून इस्त्रोने पहिल्या चंद्रयानाचं प्रक्षेपण केलं होतं. चंद्राच्या कक्षेत 3400 फे-या मारल्यानंतर ते 9 ऑगस्ट 2009 पासून गायब झालं होतं.