नवी दिल्ली - जेरुसलेमच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये भारताने अमेरिकेच्या विरोधात मतदान करुन मोठी चूक केली आहे असे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा स्वामी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. सोशल मीडिया टि्वटरवर मोठया संख्येने भारतीयांनी स्वामींच्या मताशी सहमती दर्शवली. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती.
जेरुसलेमला इस्त्रालयची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर गुरुवारी संयुक्त राष्ट्रामध्ये मतदान झाले. यावेळी भारतासह 128 देशांनी अमेरिकेच्या निर्णयाविरोधात मतदान केले. इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनशी चर्चा करुन जेरुसलेमसंबंधी अंतिम निर्णय घ्यावा अशी भारताची भूमिका आहे. इस्त्रायलचे पूर्वीपासून समर्थन करणारे स्वामी म्हणाले कि, भारताने राष्ट्रहिताच्या विरोधात जाऊन मतदान केले. काश्मीरच्या विषयावर पॅलेस्टाइन कधीच भारताचे समर्थन करत नाही पण इस्त्रायल नेहमीच भारताच्या पाठिशी उभा राहिला आहे असे स्वामी म्हणाले.
पश्चिम जेरुसमेल इस्त्रायलचा भूभाग आहे त्यामुळे अमेरिकेचे काहीही चुकलेले नाही असे स्वामी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर्षीच जुलै महिन्यात इस्त्रायलचा दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्वपूर्ण करार झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 डिसेंबरला जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. जेरुसलेमला अधिकृतरित्या मान्यता दिल्यानंतर अमेरिका आपला दूतावास या प्राचीन शहरात हलवेल अशी माहिती अमेरिकन अधिका-यांनी दिली.
जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला अनेक अरब राष्ट्र आणि युरोपियन देशांचा विरोध आहे. अमेरिकेला आपला दूतावास जेरुसलेमला हलवायला तीन ते चार वर्ष लागतील असे अधिका-यांनी सांगितले. ट्रम्प यांनी एका फटक्यात अमेरिकन धोरण बदलून टाकले. पॅलेस्टाईनसोबत चर्चा करुन जेरुसलेमबद्दल निर्णय घ्यायचा असे अमेरिकेचे धोरण होते. पॅलेस्टाईनला पूर्व जेरुसलेमला आपली राजधानी बनवायचे होते. जेरुसलेमवरील इस्त्रायला हक्क आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केलेला नाही पण अमेरिकेच्या बदललेल्या भूमिकेमुळे हळूहळू अन्य देशही अमेरिकेच्या मार्गाने जाऊ शकतात.