नवी दिल्ली : भारत आणि मालदीवमधील राजनैतिक वाद सध्या सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी इमोशनल फोबिया क्रिएट करतात, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टोला हाणला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व काही वैयक्तिकरित्या घेत आहेत. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. वेळेनुसार काम केले पाहिजे. नरेंद्र मोदी इमोशनल फोबिया क्रिएट करतात."
दरम्यान, मालदीवच्या युवा मंत्रालयातील उपमंत्री मालशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महझूम मजीद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर भाष्य केले होते. यानंतर मालदीव सरकारने तिघांच्या वक्तव्यावर नाजारी व्यक्त करत त्यांना मंत्रीपदावरून निलंबित केले.
काय केले होते भाष्य?मालशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महझूम मजीद यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश मालदीवला पर्यायी पर्यटनस्थळ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
मालदीव सरकारने काय म्हटले?मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "मालदीव सरकारला विदेशी नेते आणि उच्चपदस्थ लोकांविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांबद्दल माहिती आहे. ही मते वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही." दरम्यान, मालदीवच्या भारतातील राजदूताला सोमवारी (8 जानेवारी) परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. यादरम्यान भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यावर तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचवेळी, माले येथील मालदीव सरकारने भारतीय उच्चायुक्त मुनू मुहावर यांना सांगितले की, नरेंद्र मोदींवरील टिप्पणी सरकारची भूमिका दर्शवत नाही.