नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद राजस्थानमध्ये झाली असून सूर्यदेवाने चक्क तापमानाचे अर्धशतकच झळकावले आहे. भारतीय हवामान खात्याने राजस्थानमधील चुरू येथे 50.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. देशातील आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची ही नोंद करण्यात आली आहे. देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे. तेथील कमाल तापमान 45 अंशांवर दाखल झाले आहे. राजधानी दिल्लीही तापली असून, कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
राजस्थानमध्ये यापूर्वी 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी शुक्रवारी (31 मे) 49.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. भारतीय हवामान खात्याने देशातील सर्वात तप्त दिवस या ठिकाणी नोंदवला गेला असल्याची माहिती दिली. श्री गंगानगर येथे याआधी 30 मे 1944 मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी 49.4 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर आता तब्बल 75 वर्षांनी पुन्हा एकदा राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मात्र, चुरु येथील तापमानाने श्री गंगानगर येथील सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे; हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण आहे.
राजस्थानच्या बीकानेरमध्ये 46.6 अंश सेल्सिअस, जैसलमेरमध्ये 46.5 अंश सेल्सिअस, जोधपूर 44.7 अंश सेल्सिअस, कोटा 44.6 अंश सेल्सिअस, अजमेर 44.5 अंश सेल्सिअस, बाडमेर 44.5 अंश सेल्सिअस, जयपूर 44.2 अंश सेल्सिअस आणि उदयपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमान वाढल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाचे दिवस नोंदवले गेले आहेत.