ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - एनएसजी गटाचे सदस्यपद असो किंवा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला दहशतवादी घोषित करणे या विषयांवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोंडी करणा-या चीनला अद्दल घडवण्यासाठी भारताने विएतनामबरोबर लष्करीसंबंध विकसित करण्यावर भर दिला आहे.
चीनचे समुद्र सीमेवरुन शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहेत. यात विएतनामही आहे. चीनच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी भारत विएतनामला जमिनीवरुन हवेत मारा करणारी आकाश क्षेपणास्त्र देऊ शकतो. या क्षेपणास्त्राच्या विक्रीसंबंधी भारताची विएतनामबरोबर चर्चा सुरु आहे.
भारताने सध्या चीनच्या विरोधात असलेल्या जापान, विएतनाम या देशांबरोबर लष्करी संबंध विकसित करण्याला प्राधान्य दिले आहे. भारताने याआधी विएतनामला ब्राम्होस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र देण्याचीही तयारी दाखवली होती. भारत यावर्षीपासून विएतनामच्या फायटर पायलटसना सुखोई-30एमकेआय हे अत्याधुनिक लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे. चीनच्या शत्रूंना आपला मित्र बनवण्याची भारताची रणनिती आहे.