ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ४ - कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिफारशींना बीसीसीआयमध्ये लागू करण्याचा निर्धार केलेल्या निवृत्त न्या. आर. एम. लोढा समितीने आता, बँकांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) व्यवहार रोखण्याचे निर्देश दिले आहेत. लोढा समितीच्या शिफारसीमुळे बीसीसीआयकेडे आर्थिक तुटवडा होणार आहे.
लोढा समीतीच्या शिफारसीमुळे सध्या सुरु असलेली भारत-न्युझीलंडची मालिका रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. एक कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने बाकी आहेत. ८ तारखेपासून शेवटचा कसोटी सामना होणार होता. ३ कसोटी सामन्याची मालिका २-०ने भारताने यापुर्वीच खिशात घातली आहे.
लोढा समितीने बीसीसीआयला पत्र लिहून राज्य क्रिकेट संघटनांना दिला जाणारा निधी आणि अनुदानाबद्दल प्रश्न विचारले आहेत. बीसीसीआयची खाती संभाळणारी येस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रलाही लोढा समितीने ईमेल पाठवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही बँकांनी सोमवारपासून बीसीसीआयची खाती गोठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोढा समितीची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने केल्याची दोन्ही बँकांना माहिती आहे.
न्यूझीलंड बोर्डाला द्यायला आमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही तिसरा कसोटी सामना कसा खेळणार ? असे सवाल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिका-याने विचारला. बीसीसीआयकडून संलग्न राज्य क्रिकेट संघटनांना जो निधी दिला जातो त्याबद्दल लोढा समितीने प्रश्न विचारले आहेत.
राज्य क्रिकेट संघटनांना निधी वाटप करुन बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत आहे असे लोढा समितीने सोमवारी बीसीसीआय पदाधिका-यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ ऑक्टोंबरला होणार असून, त्यावेळी सर्व चित्र स्पष्ट होईल असे लोढा समितीमधील सूत्रांनी सांगितले.