नवी दिल्ली: कोणताही देश अवैध घुसखोरी सहन करणार नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (NRC) भारतातील नागरिकांविरोधात नाही. त्यामुळे लोकांनी शांत राहावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं. विरोधकांकडून देशवासीयांना भडकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. कोणत्याही परदेशी व्यक्तीनं येऊन वास्तव्य करायला भारत म्हणजे धर्मशाळा नाही, असं देखील गडकरी म्हणाले. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. त्यावर गडकरींनी भाष्य केलं. कोणताही देश अवैध घुसखोरी सहन करणार नाही. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार धर्म, जाती आणि पंथावरुन कोणासोबतही भेदभाव करत नाही. मात्र काही पक्ष अल्पसंख्यांकांची दिशाभूल करुन त्यांना घाबरवण्याचं काम करत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. भारतातील जनतेला सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन लोकांची दिशाभूल करणारे पक्ष देशाच्या एकता आणि अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका गडकरींनी केली. यावेळी गडकरींनी हिंदुत्वाबद्दलदेखील त्यांचे विचार मांडले. हिंदुत्व म्हणजे पूजा-पद्धती नसून जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंदू हा शब्द संकुचित नाही, असं गडकरी म्हणाले.
NRC: घुसखोरी करणाऱ्यांना देशात राहता येणार नाही; गडकरींनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:58 PM