जर्मनी, यूके, ब्राझील अन्...या देशांमध्ये एकाचवेळी होतात सर्व निवडणुका, अशी आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 02:53 PM2023-09-01T14:53:54+5:302023-09-01T14:54:10+5:30

केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे एक देश-एक निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

India One Nation One Election, Germany, UK, Brazil and other countries, all the elections are held simultaneously, this is the process | जर्मनी, यूके, ब्राझील अन्...या देशांमध्ये एकाचवेळी होतात सर्व निवडणुका, अशी आहे प्रक्रिया

जर्मनी, यूके, ब्राझील अन्...या देशांमध्ये एकाचवेळी होतात सर्व निवडणुका, अशी आहे प्रक्रिया

googlenewsNext

नवी दिल्ली: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यामुळे आता एक देश-एक निवडणुकीची (One Nation One Election) चर्चा सुरू झाली आहे. एक देश-एक निवडणुकीबाबत सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक आणू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. सरकारने यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. दरम्यान, जगात असे काही देश आहेत, जिथे एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात.

मोदी सरकारने अनेकदा ‘एक देश-एक निवडणूक’वर भाष्य केले आहे, पण आता त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना करण्यात आले आहे. ही समिती एक देश-एक निवडणुकीसाठी काम करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा एक देश, एक निवडणुकीवर भाष्य केले आहे. गेल्या महिन्यात राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी एक देश-एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा योग्य वापर करता येईल आणि वारंवार आचारसंहिता लागू न झाल्याने विकासकामांवर परिणाम होणार नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला होता. 

कोणत्या देशात एकाच वेळी निवडणुका होतात ?

- जगात असे अनेक देश आहेत, जिथे सर्व निवडणुका एकाच वेळी होतात. दक्षिण आफ्रिकेत संसद, प्रांतीय विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होतात. येथे दर पाच वर्षांनी निवडणुका होतात.

-स्वीडनमध्ये एकाच वेळी निवडणुका होतात. दर चार वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका तसेच काउंटी आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होतात.

-बेल्जियममध्ये पाच प्रकारच्या निवडणुका आहेत. दर पाच वर्षांच्या अंतराने घेतल्या जातात आणि सर्व निवडणुका एकाच वेळी होतात.

-यूकेमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स, स्थानिक निवडणुका आणि महापौरपदाच्या निवडणुका एकाच वेळी होतात. सर्व निवडणुका मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होतात. यूकेच्या घटनेनुसार, सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि इतर कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही, तरच लवकर निवडणुका होऊ शकतात.

-इंडोनेशियामध्ये अध्यक्षीय आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होतात. याशिवाय जर्मनी, फिलीपिन्स, ब्राझील, बोलिव्हिया, कोलंबिया, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, गुआना, होंडुरास या देशांमध्ये सर्व निवडणुका एकाच वेळी होतात.

भारतात एकाचवेळी निवडणुका झाल्या होत्या
आज देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत नसल्या तरी एकेकाळी झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा 1951-52 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी लोकसभेच्या तसेच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या होत्या. त्यानंतर 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. पण 1968 आणि 1969 मध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करण्यात आल्या. 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. अशाप्रकारे एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेला तडा गेला.
 

Web Title: India One Nation One Election, Germany, UK, Brazil and other countries, all the elections are held simultaneously, this is the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.