नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. देशाच्या रक्षणासाठी भारत आपली ताकद दाखविण्यासाठी मागे हटणार नाही. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अनेकदा पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून भारतासोबत युद्ध लढण्याची भाषादेखील केली आहे.
संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, भारताचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत भारताने कोणावर हल्ला केला नाही, यापुढेही करणार नाही. मात्र याचा हा अर्थ नाही की, भारत आपल्या रक्षणासाठी स्वत:ची ताकद दाखविण्यास कमी पडेल. सोलमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पत्रकार परिषदेत दक्षिण कोरियाचे वरिष्ठ सैन्याचे अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि दहशतवादी यांना खतपाणी देणाऱ्यांविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर सामुहिक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवाद्यांचे समर्थन आणि दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली पाहिजे. सध्या संपूर्ण जग अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या आव्हानांमध्ये सर्वात गंभीर समस्या दहशतवादाची आहे.
जगातील कोणताही देश दहशतवादापासून सुरक्षित नाही. भारत, यूएन आणि अन्य माध्यमातून दहशतवादाची लढण्याचा द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सहाय्य करेल. जागतिक रणनीतीमध्ये उद्भवलेल्या समस्येचा उल्लेख करत जगात शांती आणि सुरक्षा यांच्यासमोरील आव्हानं वाढत आहे असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
याआधी काश्मीर हा नेहमी भारताचा भाग राहिलेले आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होतेच कधी? पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले होते. तसेच ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी रडगाणे गात असता. पाकिस्तानचा काश्मीरवर काहीही हक्क नाही.'' पाकिस्तानने त्यांच्या ताब्यातील काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे. यापुढे काश्मीरबाबत चर्चा झाली तर ती केवळ पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरबाबतच होईल. तसेच पीओकेच नाही तर गिलगिट-बाल्टिस्थान हासुद्धा भारताचाच भाग आहे असंही त्यांनी सांगितले होते.