I.N.D.I.A. आघाडीनं तयार केली समन्वय समिती, या 13 नेत्यांना दिली मोठी जबाबदारी; थीमही ठरली!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 04:01 PM2023-09-01T16:01:34+5:302023-09-01T16:02:30+5:30
मुंबई येथे सुरू असलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे.
विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीने वेगवेगळ्या पक्षांच्या 13 नेत्यांची समन्वय समिती तयार केली आहे. या समितीत शरद पवार, स्टॅलिन, अभिषेक बॅनर्जी, हेमंत सोरेन आणि राघव चड्ढा यांच्यासह एकूण 13 नेत्यांचा समावेश असेल. मात्र अद्याप, आघाडीचा संयोजक कोण असणार? यासंदर्भात निर्णय झालेला नाही. केसी वेणुगोपाल, संजय राऊत, तेजस्वी यादव, जावेद खान, लल्लन सिंह, डी राजा, उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांचाही या समितीत समावेश असेल. मुंबई येथे सुरू असलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचा आजचा शेवटचा दिवस आहे.
"जुडेगा भारत, जीतेगा इंडिया"
महत्वाचे म्हणजे, I.N.D.I.A. कडून सर्व प्रकारचा संवाद आणि माध्यमांसंदर्भातील रणनीती, तसेच कॅम्पेनची थीम वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल. ही थीम "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया", अशी असेल. हेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
अशी आहे I.N.D.I.A. ची रणनीती? -
लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये संयुक्त रॅलीचे आयोजन केले जाईल. सार्वजनिक प्रश्नांवर या रॅली केल्या जातील. याशिवाय, विविध राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया गिव्ह अँड टेक भावनेने पूर्ण केली जाईल. तसेच, आगामी लोकसभानिवडणूक सर्व पक्ष एकत्रितपणे लढतील, असा निर्ययही या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.
NDA ला सत्तेवरून दूर करण्यासाठी मंथन -
एकीकडे मुंबईत 28 विरोधी पक्षांचे नेते NDA आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटविण्यासाठी मंथन करत असतानाच, दुसरीकडे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय पटलावर बॅक टू बॅक चाली चालत आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष आधिवेशन बोलावले आहे. हे आधिवेश बोलावून सरकारने विरोधी पक्षांना, सरकारच्या मनात नेमके काय चालले आहे? यासंदर्भात विचार करायला भाग पाडले आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी तर होणार नाहीत ना? कारण, एक देश एक निवडणूकी संदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे.