- आदेश रावल नवी दिल्ली - जागावाटपाबाबत १३ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक होणार आहे. मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीचे खरे आव्हान सुरू झाले आहे.
राज्यांतील जागा वाटपाचा फॉर्म्युला आघाडीतील पक्षांना ठरवायचा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये १८-२० जागा हव्या आहेत. त्यावर अखिलेश यादव तयार नाहीत, तर दुसरीकडे चंद्रशेखर रावण यांनाही निवडणूक लढवायची आहे. चंद्रशेखर यांना नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. परंतु, समाजवादी पक्ष त्यांना त्यांच्या कोट्यातून जागा देऊ इच्छित नाही. याशिवाय जयंत चौधरी यांच्या जागांच्या संख्येबाबतही अंतिम निर्णय होणार आहे.
बिहारमध्ये काँग्रेसला लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्याकडून दहा जागा हव्या आहेत, तर आरजेडी आणि जेडीयू काँग्रेसला सहा जागा देण्यास तयार आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षाही आघाडीसाठी अडचणी निर्माण करत आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये दोन्ही पक्षांचे राज्यातील नेते एकमेकांच्या विरोधात आहेत.
विविध राज्यातील सर्वपक्षीय आव्हानेआम आदमी पार्टीला दिल्ली - पंजाबच्या बदल्यात गुजरात आणि हरयाणामध्ये जागा हव्या आहेत. हा निर्णय कठीण असेल, तर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला अधिक जागा हव्या आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी असताना काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि डावे कोणत्याही परिस्थितीत सोबत येण्यास तयार नाहीत. प. बंगालमध्ये मार्ग शोधणे, हे आघाडीसमोरचे मोठे आव्हान असेल.