नवी दिल्ली - देशातील विविध भागांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे नेते संयुक्त जाहीर सभांचा धडाका लावणार असून पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळ येथे होणार आहे. याशिवाय नागपूर, पाटणा, चेन्नई, गुवाहाटी आणि लखनौमध्येही जाहीर सभा घेण्याचे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत तीन निर्णय घेण्यात आले.
संयुक्त जाहीर सभांमध्ये भाजपच्या नऊ वर्षांच्या सत्तेत वाढलेली महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवर झोड उठविण्यात येणार आहे. याशिवाय ‘इंडिया’तील घटक पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी लवकरच चर्चा सुरू करण्याचा तसेच सत्ताधारी भाजपच्या बाजूने एकतर्फी चर्चा करणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या अँकर्सच्या कार्यक्रमांवर ‘इंडिया’ आघाडीच्या प्रतिनिधींनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
जातीनिहाय जनगणनेचे समर्थनकाही घटक पक्षांच्या आग्रहामुळे जातीनिहाय जनगणनेच्या मागणीचे समर्थन करण्याची भूमिका घेण्यात आली. या मुद्याशी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी यांनी असहमती व्यक्त केली होती.