नवी दिल्ली : जी-२० देशांची बैठक आणि मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, जी-२० साठी ज्या नेत्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकार आता तिसरी नोटबंदी करेल, कारण आपल्या चलनी नोटा आहेत, त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ते नोटांवरुनही इंडिया हटवतील आणि लोकांना पुन्हा नोटा बँकांमध्ये जमा करायला लावतील, असं संजय सिंह म्हणाले आहेत. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनाही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला.
आप खासदार संजय सिंह म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून एक वाद निर्माण केला जात आहे. भाजप (BJP) आणि मोदी सरकारला राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकायचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. याची सुरुवात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केली होती. 'इंडिया' हा शब्द काढून टाकला पाहिजे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर घटनेतूनच 'इंडिया' हा शब्द काढून टाकावा, अशा बातम्या मोदी सरकार प्रायोजित करत आहेत."
"बाबासाहेबांचा इतका तिरस्कार का करता?"आप खासदार संजय सिंह पुढे म्हणाले की, "मला त्यांना सांगायचं आहे की, ते बाबासाहेबांचा इतका तिरस्कार का करतात? आरएसएस आणि भाजपमध्ये अशी निराशा आहे की, त्यांच्याशी संबंधित कोणीही विचारवंत बनलं नाही. त्यांना काहीही लिहिता आलं नाही, त्यामुळेच बाबासाहेबांचं लिखाण कसं काढायचं असा विचार ते सातत्यानं करत असतात. राज्यघटनेच्या पहिल्या कलमात म्हटलं आहे की, "इंडिया दैड इज भारत विल बी यूनियन ऑफ स्टेस्ट."
"आयआयएम, एम्स आणि इस्त्रो या सर्व नावांमध्ये इंडिया आहे"पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित आणि आदिवासींबद्दल द्वेष दाखवत असल्याचा आरोपही यावेळी बोलताना संजय सिंह यांनी केला. जोपर्यंत इंडिया आघाडीच्या युतीचा संबंध आहे, आम्ही लिहिले होते 'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया'. त्यामुळे ते (मोदी सरकार) इंडिया हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आयआयएम, एम्स आणि इस्त्रो या सर्व संस्थांच्या नावांमध्येही इंडिया आहे. हा मोदी सरकारचा नापाक हेतू आहे. आम्ही याला विरोध करू आणि ज्यांची बाबासाहेबांवर श्रद्धा आहे ते हे नक्कीच खपवून घेणार नाहीत, असंही ते म्हणाले.