भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद जगभर परिचीत आहे. त्यामुळे, भारत आणि पाकिस्तान सीमारेषेसंदर्भात सातत्याने घडामोडी घडत असतात. अनेकदा क्वीझ कॉम्पीटिशन असेल किंवा स्पर्धा परीक्षांमध्येही या सीमावादावर, सीमारेषेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. नुकतेच, एका परीक्षेत भारत-पाक बॉर्डरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्याने भन्नाट उत्तर दिलंय. विद्यार्थ्याची ती उत्तर पत्रिका चांगलीच व्हायरल झाली आहे. कारण, या उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्याने सीमारेषेच्या प्रश्नावर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचा नामोल्लेख केला आहे.
पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत राहिली. सीमा हैदर विनापरवानगी भारतात आल्यामुळे ती जासूस आहे का, तीचं भारतात येण्याचं खरं कारण काय, अशा अनेक प्रश्नांवर मंथन झाले. त्यानंतरही सोशल मीडियावरील विधानं आणि डान्समुळे सीमा हैदर घराघरात पोहोचली. नेटीझन्सला सीमा हैदरची चांगलीच ओळख झाली. मात्र, राजस्थानमधील एका विद्यार्थ्याने परीक्षेत दिलेलं उत्तर वाचून सीमा हैदर घराघरात पोहोचल्याचं सिद्ध झालंय. एका सरकारी शाळेतील परीक्षेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणती सीमा (सीमारेषा) आहे, त्या सीमेची (सीमारेषेची) लांबी किती आहे? असा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना एका विद्यार्थ्याने चक्क सीमा हैदरची उंची किती आहे, हेच सांगितलंय. हे उत्तर पाहून नेटीझन्स चांगलीच मजा घेत आहेत. १२ वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, दोन्ही देशातील सीमा ही सीमा हैदर आहे, जिची लांबी ५ फूट ६ इंच एवढी आहे, असे उत्तर परीक्षार्थी विद्यार्थ्याने दिले आहे. सध्या सोशल मीडियावर विद्यार्थ्याच्या उत्तराचा मजकूर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटीझन्स कमेंट करुन त्यात आणखी भर टाकत आहे, मिम्स बनवून मजा घेत आहेत.
दरम्यान, व्हायरल उत्तरपत्रिका राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील बसेडी सरकारी शाळेच्या उच्च माध्यमिक वर्गातील आहे. उत्तर पत्रिकेवर शाळेचं नाव असून तपासणाऱ्या शिक्षकांनीही त्यास शून्य गुण दिले आहेत. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही उत्तरपत्रिका आमच्या शाळेतील नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी, आम्ही सर्वोतोपरी माहिती घेतली असून ही उत्तर पत्रिका आमच्या राजकीय विद्यालयातील नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.