ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, १४ - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांदरम्यान होणारी बैठक लांबणीवर पडली आहे. भारत-पाकिस्तान सचिवांची शुक्रवारी होणारी नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी हल्ला झाल्यापासून या बैठकीचे भवितव्य अधांतरी होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही बैठक तूर्तास रद्द करण्यात आल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.
२ जानेवारी रोजी अतिरेक्यांनी पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला केला, ज्यात ७ जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले. जैश-ए-मोहम्मदच्या या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेने हल्ला चढवला होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्याचे भारताने स्पष्ट केले होते, तसे काही पुरावेही पाकिस्तानला देण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही पाकिस्तानवरील दबाव वाढला होता. त्यामुळे पाकिस्तान सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये काही जणांना संशयावरून ताब्यात घेतले. कालच ‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर याच्यासह काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र, पाकिस्तानने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नाही. मसूद अजहर याला अटक केल्याबाबत काहीही माहिती नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तव्याने सांगितले. या सर्व घडामोडींनंतर भारत- पाक सचिवांदरम्यानची बैठक रद्द करण्यात आली.