नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री यांच्यात भारताला पोकळ धमक्या देण्यासाठी चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं आहे. इम्रान खान यांनी भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा युद्धाची भविष्यवाणी केली आहे. यावेळी त्यांनी युद्धाची तारीखही सांगितली आहे.
पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तीन मंत्री शेख रशीद यांनी सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्या युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनतेला सतर्क करण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे आहेत ती फक्त दाखविण्यासाठी नाही तर त्याचा वापर करण्यासाठी आहे असा इशारा शेख रशीद यांनी भारताला दिला.
संयुक्त राष्ट्र संघात पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा दौरा करणार असून शेवटच्या श्वासापर्यंत पाकिस्तान काश्मीरसाठी लढत राहणार असल्याचा दावा शेख रशीद यांनी केला.
काही दिवसांपूर्वी शेख रशीद यांच्यावर लंडनमध्ये हल्ला झाला होता. त्यांच्या अंडे फेकण्यात आले होते. रशीद शेखने भारत-पाकिस्तान यांच्यात अण्वस्त्र युद्ध होईल असं भाष्य केलं होतं. यानंतर जेव्हा ते लंडन येथे गेले होते तेव्हा लोकांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या अंडे फेकले होते. शेख रशीद नेहमी अशा वक्तव्यांनी चर्चेत येतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधान केलं होतं की, जर भारताने पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला तर भारतीय उपखंडातील ते सर्वात मोठं युद्ध असेल आणि त्यामुळे याचा पूर्ण नकाशा बदलेल असा इशारा दिला होता.
अशातच आज शेख रशीद यांनी सांगितल्यानुसार पाकिस्तानने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा हवाला देत पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर मुद्दा उचलला आहे. काश्मीरमधील लोकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत पाकिस्तानला फटकारले आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. पाकिस्तान अथवा कोणत्याही इतर देशांनी काश्मीर प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा काहीही संबंध नाही, काश्मीरात जो काही हिंसाचार सुरू आहे त्याच्यामागे पाकिस्तानच आहे असं राहुल गांधींनी सांगितले आहे.