नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर डेल्टा व्हेरिएंटने जगभरात धुमाकूळ घातला. मात्र, आता ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण (Corona Vaccination) हाच एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय असून, जगभरातील देश यावर भर देत आहे. इस्रायलसारख्या देशात तर बुस्टर डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र, यातच भारताने अमेरिका आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना मागे टाकत लसीकरण मोहिमेत सर्वांत आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारतात सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. भारतातील करोना लसीकरण मोहिमेने कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, असे मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.
हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे
एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या बातमीत, भारताने लसीकरणाचे लक्ष्य चुकवल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे आणि संपूर्ण चित्र दर्शवत नाही, असे सरकारने एक परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात, लसीकरणासाठी कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांच्या तुलनेत भारताची राष्ट्रीय लसीकरण मोहीम ही सर्वात यशस्वी आणि सर्वांत मोठा लसीकरण कार्यक्रम आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, १६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून भारताने पात्र नागरिकांना पहिल्या डोसच्या ९० टक्के आणि दुसऱ्या डोसच्या ६५ टक्क्यांपेक्षा जास्त डोस दिले आहेत. या मोहिमेमध्ये, भारताने जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी केली. ज्यात अवघ्या ९ महिन्यांच्या कमी कालावधीत १०० कोटी डोस देणे, एकाच दिवसात २.५१ कोटी डोस देणे आणि अनेकदा दररोज १ कोटी डोस देणे, अशा कामगिरीचा समावेश आहे.