लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आपली धोरणे अमेरिकेतील ईव्ही कार निर्मात्या टेस्लाला सुसंगत बनवणार नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले आहे. जगभरातील सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना आकर्षित करण्यासाठी कायदे आणि शुल्क नियम तयार केले जातील, जेणेकरून भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत ते आपला उद्योग उभारू शकतील, असेही ते म्हणाले.
टेस्ला कंपनीला प्रारंभिक सीमा शुल्कात ३३,१०,०९४ रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कारसाठी ७० टक्के आणि त्यापेक्षा उच्च किमतीच्या कारसाठी १०० टक्के सवलत हवी आहे. गोयल म्हणाले की, कोणत्याही एका कंपनीला अनुकूल अशी धोरणे तयार करणार नाही आणि त्याऐवजी जगभरातील सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना भारतात उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात येईल.
आम्ही अनेक उपक्रमांवर काम करत आहोत. युरोप, अमेरिका, जपान, कोरिया, जगभरातील संभाव्य गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहोत. सरकार कोणत्याही एका कंपनीसाठी किंवा तिच्या हितासाठी धोरण तयार करत नाही. असे गोयल म्हणाले.