Indian Population in 2036 :भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला केव्हाच मागे टाकलं आहे. पण आता सरकारी आकडेवारीनुसार २०३६ पर्यंत देशाच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या काही वर्षात भारताची लोकसंख्या ही दहा कोटींनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताची लोकसंख्या २०२६ मध्ये १५२.२ कोटीपर्यंत पोहोचू शकते. सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाने सोमवारी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
पुढील १२ वर्षात म्हणजेच २०३६ पर्यंत देशाची लोकसंख्या १५० कोटींचा आकडा पार करेल असा सरकारी आकडेवारीचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला होता. त्यावेळी चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी होती आणि भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटींवर पोहोचली होती. १९५० नंतर भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.
मात्र, आता समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार १२ वर्षांनंतर भारताची लोकसंख्या १५२.२ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ‘भारतातील महिला आणि पुरुष २०२३’ या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार लिंग गुणोत्तर २०३६ पर्यंत १००० पुरुषांमागे ९५२ महिलांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०११ च्या जनगणनेत हा आकडा ९४३ इतका होता.
अहवालानुसार, लोकसंख्येत महिलांच्या टक्केवारीतही थोडीशी सुधारणा दिसून येणार आहे. २०३६ मध्ये महिलांची टक्केवारी ४८.८ टक्के पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. २०११ मध्ये ती ४८.५ टक्के होती. प्रजनन दरात घट झाल्यामुळे, २०११ च्या तुलनेत २०३६ मध्ये १५ वर्षांखालील लोकांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत, ६० वर्षे आणि त्यावरील लोकसंख्येचे प्रमाण वेगाने वाढेल.
दरम्यान, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने एप्रिल २०२४ मध्ये एका अहवालात दावा केला होता की, गेल्या ७७ वर्षांत भारताची लोकसंख्या दुप्पट झाली आहे. भारताची लोकसंख्या ही १४४.१७ कोटींवर पोहोचली आहे. या अहवालानुसार, देशात २००६ ते २०२३ दरम्यान २३ बालविवाह झाले आहेत. तसेच, प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून ० ते १४ वर्षे वयोगटातील लोक भारताच्या एकूण लोकसंख्येच्या २४ टक्के आहेत. १५ ते ६४ वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ६४ टक्के आहे.
दरम्यान, १ जानेवारी २०२४ रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्जांच्या पुढे गेली आहे. १ जानेवारी २०२३ रोजी हा आकडा ७.९४ अब्ज होता. अमेरिकेच्या सेन्सस ब्युरोच्या एका अहवालानुसार २०२३ मध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ७५ दशलक्षने वाढ झाली आहे. जगात दर सेकंदाला ४.३ लोक जन्माला येतात, तर दर सेकंदाला २ लोकांचा मृत्यू होतो.