नवी दिल्ली: टपाल खात्यानं तोट्याच्या बाबतीत बीएसएनएल, एअर इंडियाला मागे टाकलं आहे. 2018-19 मध्ये टपाल खात्याचा तोटा 15 हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये टपाल खात्याचा तोटा 150 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे आता भारतीय पोस्ट ही सर्वाधिक तोट्यात असलेली सरकारी कंपनी झाली आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अन्य भत्ते यांच्यावर होणाऱ्या खर्चामुळे टपाल खातं तोट्यात असल्याचं सांगितलं जात आहे. वेतन आणि भत्त्यांवर पोस्टाला दरवर्षी आपल्या महसूलापैकी 90 टक्के रक्कम खर्च करावे लागतात. पोस्ट खात्यानंतर बीएसएनएलचा तोटा सर्वाधिक आहे. 2018-19 मध्ये बीएसएनएल कंपनीला 7 हजार 500 कोटींचा तोटा झाला. तर 2017-18 मध्ये एअर इंडियाला 5,337 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पोस्ट खात्याला 2018-19 मध्ये 18 हजार कोटींचा महसूल मिळाला. यातील 16,620 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्त्यावर खर्च झाले. याशिवाय बीएसएनएलला वर्षाकाठी 9,782 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर खर्च करावे लागतात. बीएसएनएल दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांवर 26,400 कोटी रुपये खर्च करतं. 2020 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांवर 17,451 कोटी रुपये आणि निवृत्ती वेतनावर 10,271 कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे. या काळात कंपनीचं उत्पन्न 19,203 कोटी रुपये असेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बीएसएनएलचा पाय आणखी खोलात जाणार आहे.
बीएसएनएल, एअर इंडिया पाठोपाठ टपाल खातं संकटात; तोटा 15 हजार कोटींच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:12 PM