ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - जगभरात प्रिंट मीडिया किंवा मुद्रित माध्यमांचा संकोच होत असताना भारतात मात्र मुद्रित माध्यमांची गेल्या 10 वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन म्हणजचे एबीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2006 ते 2016 या दशकभरात मुद्रित झालेल्या वृत्तपत्रांचे सरासरी दैनिक आकडेवारी 3.91 कोटी प्रतिंवरून 2.37 कोटी प्रती इतकी वाढली आणि ती 6.28 कोटी प्रती इतकी झाली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये ही वाढ वार्षिक 4.87 टक्के असून या वर्षी ही वाढ 8 टक्क्यांची असेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
देशभरात वाढलेली साक्षरता, अर्थव्यवस्थेनं घेतलेली उभारी आणि कमी किमतीत असलेली सहजसुलभ उपलब्धता ही वृत्तपत्रांच्या वाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे एबीसीने नमूद केले आहे. त्याशिवाय आकर्षक सहदैनिके, पुरवण्या आणि बदलती लेखनशैलीही वाढसाठी पूरक ठरत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एबीसीने सोमवारी पत्रकार परीषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. एबीसीचे अध्यक्ष व्यंकट यानी भारतातील एकूण माध्यमांमध्ये मुद्रित माध्यमांचा वाटा सर्वाधिक म्हणजे जवळपा 90 टक्के इतका असल्याचे सांगितले. गेल्या 10 वर्षांमध्ये प्रकाशनांची संख्याही चांगलीच वाढल्याचे ते म्हणाले. तसेच पुढील 10 वर्षांमध्येही हे क्षेत्र दुपटीने वाढेल असे व्यंकट म्हणाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुद्रित माध्यमांची वाढ खुंटलेली असताना भारतात मात्र या क्षेत्राची वाढ होत असल्याचे चित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचकांनी मुद्रित माध्यमांनी केलेले बदल स्वीकारल्याचे यातून अधोरेखीत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मुद्रित माध्यमांमध्ये गेल्या १५ वर्षांमध्ये ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, जवळपास तेवढीच गुंतवणूक येत्या दशकात केली जाईल असा अंदाजही ‘एबीसी’चे गिरीश अगरवाल यांनी व्यक्त केला आहे.
काही ठळक बाबी -
- २०१६ अखेर देशातील दैनिके व वृत्तपत्रांची संख्या ९१०
- 2016 अखेरीस देशातील नियतकालिके, वार्षिकांची संख्या ५७
- एबीसीचे १,००० हून अधिक सदस्य आहेत.
- हिंदी वृत्तपत्रांचं वितरण सर्वाधिक असून त्यांची दैनिक सरासरी 2.2 कोटी प्रति इतकी आहे.
- त्याखालोखाल इंग्रजी वृत्तपत्रांचा 85.50 लाख प्रतिंसह दुसरा क्रमांक आहे.
- तिसऱ्या स्थानावर 45.50 लाख प्रतिंसह मल्याळी वृत्तपत्रे आहेत.
- तर त्याखालोखाल 43.30 लाख दैनंदिन खपासह मराठी वृत्तपत्रे आहेत.
भारतातल्या मुद्रित माध्यमांसाठी ही वाढ समाधानाची असून येत्या दशकातही ही वाढ अशीच राहील अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.