ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - भारतातील काही भागांमध्ये आजही दोनवेळच्या अन्नाची भ्रांत असताना, जगातील १० श्रीमंत देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे. भारतातील एकूण व्यक्तीगत संपत्ती ५६०० अब्ज डॉलर्स आहे. अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार टॉप टेन श्रीमंत देशांच्या यादीत भारत ७ व्या स्थानावर आहे. कॅनडा ८, ऑस्ट्रेलिया ९ आणि इटाली १० व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत एकूण व्यक्तीगत संपत्ती ४८,९०० अब्ज डॉलर्स आहे.
चीन दुस-या आणि जापान तिस-या स्थानावर आहे. चीनमध्ये एकूण व्यक्तीगत संपत्ती १७,४०० अब्ज डॉलर्स आणि जापानमध्ये १५,१०० अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. या यादीत इंग्लंड ४,जर्मनी ५ व्या आणि फ्रान्स ६ व्या स्थानावर आहे.
भारताने लोकसंख्येच्या बळावर या यादीत स्थान मिळवले आहे. फक्त दोन कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या ऑस्ट्रेलियाची या यादीतील झेप कौतुकास्पद आहे.