ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ९ - देशाबाहेर काळा पैसा जाण्याच्या बाबतीत भारत जगामध्ये चौथ्या स्थानावर असून २००४ ते २०१३ या कालावधीत भारतातून तब्बल ५१ अब्ज डॉलर्स (सुमारे ३.४० लाख कोटी रुपये) बाहेरच्या देशांमध्ये गेल्याचे अमेरिकास्थित संस्थेने म्हटले आहे.
विशेष म्हणजे भारताचे संरक्षण क्षेत्रासाठी असलेले बजेट ५० अब्ज डॉलर्सपेक्षा कमी आहे. काळा पैसा देशाबाहेर जाण्यामध्ये जगात चीन आघाडीवर असून याच कालावधीत चीनमधून १३९ अब्ज डॉलर्स देशाबाहेर गेले. तर त्याखालोखाल रशिया (१०४ अब्ज डॉलर्स) व मेक्सिको (५२.८ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक आहे. हा अहवाल ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी (GFI) या वॉशिंग्टनस्थित संस्थेने तयार केला आहे.
करचुकवेगिरी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार व अन्य अनैतिक धंद्याच्या माध्यमांतून हा पैसा काळा होत असल्याचे व देशाबाहेर जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संस्थेच्या म्हणण्यानुसार २०१३ या वर्षी सर्वाधिक म्हणजे १.१ लाख कोटी डॉलर्स इता प्रचंड प्रमाणात काळा पैसा विकसनशील देशांमधून अन्य देशांमध्ये गेला आहे.
काळ्या पैशाची निर्मिती आणि त्याचे देशाबाहेर जाणे हे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत मारक ठरत असल्याचे निरीक्षण GFI चे अध्यक्ष रेमंड बाकर यांनी म्हटले आहे.