नवी दिल्ली : भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात शुक्रवारी सांगितले. चीनने सीमेवर केलेल्या कुरापतींमुळे त्या देशासोबत भारताचे संबंध तणावाचे बनले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी चीनला इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, चीनने पूर्व लडाखमध्ये केलेला घुसखोरीचा प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय लष्कराच्या २० जवानांनी बलिदान दिले. चीनलगतच्या सीमेवर भारताने स्वत:च्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अतिरिक्त फौजही तैनात केली आहे. कोरोनाने मरण पावलेले माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व सहा खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने वेळीच योग्य उपाययोजना केल्याने असंख्य लोकांचे प्राण वाचले आहेत. जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविली जात असल्याचा प्रत्येक नागरिकाला सार्थ अभिमान आहे. कोरोनाकाळात देशातील ८० कोटी गरीब लोकांना आठ महिने पुरेल इतके मोफत अन्नधान्य केंद्र सरकारने दिले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी होत आहेत. हवामान बदलासंदर्भात झालेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारतही सामील आहे.
३७० कलम रद्द केल्याने काश्मिरी जनतेला फायदाराष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे जम्मू-काश्मीरच्या जनतेने स्वागत केले आहे. हे कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमधील लोकांना अधिक अधिकार मिळाले आहेत. आता हा केंद्रशासित प्रदेश नक्कीच मोठी प्रगती करू शकेल.