नवी दिल्ली-
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चीन सरकारनं कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानं विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे चीनमध्ये सध्या इबूप्रोफेन (Ibuprofen) आणि पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. चीन संकटात असताना भारतानं सीमेवरील शत्रुत्व विसरून मदतीचा हात पुढे केला आहे. भारतानं औषधांचा पुरवठा करण्यास तयारी दाखवली असून पहिली खेपही रवाना झाली आहे. तसंच यापुढील काळात आणखी मदत करण्याचीही तयारी दर्शवली आहे.
कोरोनाचा प्रसार वाढत असताना चीनमध्ये तपावरील सर्वसामान्य औषधं आणि गोळ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. डोकेदुखीसाठी इबूप्रोफेन आणि तापावरील औषध पॅरासिटेमॉल याची कमतरता निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार आणि आवश्यक औषधांची कमतरता दूर करण्यासाठी चीनला भारतानं मदतीचा हात दिला आहे. फार्मास्युटिकल्स एक्स्प्रोर्ट प्रमोशन काऊन्सिल ऑफ इंडियानं तापावरील सर्वसामान्य औषधांची निर्यात वाढवण्याची तयारी दाखवली आहे.
Pharmexcil चे चेअरपर्सन साहिल मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनकडून दोन्ही औषधांची वारंवार विचारणा होत आहे. सध्या या दोन्ही औषधांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि वाढत्या मागणीमुळे औषधांची कमतरता निर्माण झाली आहे. जेनेरिक औषधांच्या निर्मितीच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा देश आहे आणि अशा संकटकाळात भारत चीनच्या मदतीसाठी धावून आला आहे.
चीनमधील परिस्थितीवर लक्षपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हणाले, आम्ही चीनच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. फार्मसी क्षेत्रात आम्ही नेहमीच जगाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.