नवी दिल्ली-
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर दिवसागणिक पडत आहे. ही आकडेवारी निश्चितच चिंतादायक आहे. धोक्याचा इशारा देणारी आकडेवारी देशात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत निष्काळजीपणा न बाळगता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,१५७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता १९,५०० वर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासांत २,७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृत्यूंचा आकडा आता ५,२३,८६९ इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ४,०२,१७० कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी १,८९,२३,९८,३४७ इतकी झाली आहे.
देशातील पाच सर्वाधिक संसर्गाची राज्य पाहायची झाल्यास यात दिल्लीत गेल्या २४ तासांत सर्वाधिक १,४८५ रुग्ण आढळले आहेत. तर हरियाणामध्ये ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशात २६८ आणि महाराष्ट्रात १६९ रुग्ण आढळले आहेत.