नवी दिल्ली: जगभरात खनिज तेलाच्या किमती Crude oil Price वाढल्या आहेत. कोरोना संकटात लॉकडाऊन सुरू असताना तेल उत्पादक देशांना मोठा तोटा झाला. तो भरून काढण्याचा प्रयत्न आता संबंधित देशांकडून सुरू आहे. त्याचा फटका भारतासारख्या देशांना बसत आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन कर कमी केला. त्यामुळे पेट्रोलचा दर लिटरमागे ५, तर डिझेलचा दर लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाला. त्यानंतर आता इंधन दर आणखी कमी करण्यासाठी सरकारनं आणखी एक निर्णय घेतला आहे.
आपत्कालीन वापरासाठी ठेवण्यात आलेल्या खनिज तेलाचा वापर करण्याची योजना मोदी सरकारनं आखली आहे. त्यानुसार ५० लाख बॅरल्स खनिज तेल बाजारात आणलं जाईल, अशी माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं दिली आहे. पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आपत्कालीन वापरासाठी भारत ३ कोटी ८ लाख बॅरल्स खनिज तेलाचा साठा राखून ठेवला आहे. देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर तीन ठिकाणी जमिनीखाली हा साठा ठेवण्यात आला आहे.
आपत्कालीन स्थितीत वापरता यावा यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खनिज तेलापैकी ५० लाख बॅरल्स तेल पुढील ७ ते १० दिवसांत बाहेर काढण्यात येईल, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. हा साठा मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स (एमआरपीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या कंपन्यांना विकण्यात येईल. आपत्कालीन वापराचा साठा या दोन कंपन्यांशी पाईपलाईननं जोडला गेलेला आहे.
येत्या काही दिवसांमध्ये आपत्कालीन वापराच्या साठ्यातील आणखी खनिज तेल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असंदेखील अधिकाऱ्यानं सांगितलं. 'आपत्कालीन वापरासाठी असलेल्या साठ्यातील तेल काढून त्याचा वापर देशातील बाजारपेठेत करण्यासाठीच्या निर्णयासंदर्भात सरकार इतर देशांशी समन्वय राखून आहे. सरकार सध्या तेल उत्पादक देशांच्या संपर्कातदेखील आहे,' अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.