नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली असली, तरी कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत नाही. गेल्या २४ तासांत १३ हजार २०३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, १३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ०१ कोटी ०६ लाख ६७ हजार ७३६ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ०१ कोटी ०३ लाख ३० हजार ८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ०१ लाख ५३ हजार ४७० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असेही आरोग्य विभागाने सांगितले.
गेल्या २४ तासांत १३ हजार २९८ जण कोरोना मुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात ०१ लाख ८४ हजार १८२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत १६ लाख १५ हजार ५०४ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, कोरोना सक्रीय रुग्णांच्या यादीत भारत जागतिक पातळीवर १३ व्या क्रमांकावर आहे. कोरोना प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी आहे. जगभरात आतापर्यंत ०९ कोटी ९७ लाख ७१ हजार ६६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी २१.३८ लाख जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, असे समजते.