नवी दिल्ली : कोरोना संकट अद्याप नियंत्रणात आले नसले, तरी गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १६ हजार ३११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (सोमवारी) माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन आकडेवारीनंतर, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ०४ लाख ६६ हजार ५९५ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार १६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६.४२ टक्के तर कोरोनाचा मृत्युदर १.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासांत १९ हजार २९९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ कोटी ९२ हजार ९०९ वर पोहोचली आहे. तर, आताच्या घडीला देशात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २२ हजार ५२६ आहे. सलग २० व्या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन लाखांहून कमी राहिली आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आल्यानंतर आता संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारीवर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.