नवी दिल्ली: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २९ हजार ६८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (india reports 29 689 new corona cases and 415 deaths in last 24 hours)
केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात २९ हजार ६८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४१५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ४ लाख २१ हजार ३८२ झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत ४२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण ०३ कोटी ०६ लाख २१ हजार ४६९ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ३ लाख ९८ हजार १०० इतकी आहे. आतापर्यंत एकूण ४४ कोटी १९ लाख १२ हजार ३९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. सोमवारी महाराष्ट्रात ४ हजार ८७७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ११ हजार ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात एकूण ६० लाख ४६ हजार १०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.
दरम्यान, राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर मुंबई, सांगली आणि साताऱ्यात ७ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.