लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : चिनी सैन्याने ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत माघारी जाण्यास भाग पाडले. या चकमकीत एकाही जवानाचा मृत्यू झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत मंगळवारी स्पष्ट केले.
या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांनी गदारोळ करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे दाेन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
नियंत्रण रेषेवर भारताची लढाऊ विमानेभारत-चीन तणावात भारतीय वायुसेना अरुणाचल प्रदेशमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले की, लढाऊ विमानांद्वारे पाळत ठेवली जात असून विमानांच्या गस्ती उड्डाणांची संख्या वाढवली आहे.
एक इंच जमिनीवरही अतिक्रमण अशक्य
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही. - अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री