ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - चीनच्या जोरदार विरोधानंतर भारताने चीनचे फुटीरतवादी नेते डोल्कन इसा यांना मंजूर केलेला व्हिसा रद्द केला आहे. इसा चीनच्या युघूर प्रांतातील नेते आहेत. ते जर्मनीमध्ये वास्तव्याला आहेत. वर्ल्ड युघूर काँग्रेसचे नेते डोल्कन इसा यांना इनिशिएटीव्ह फॉर चायना या संस्थेने एका परिषदेसाठी भारतात निमंत्रित केले होते.
इसा यांच्यासह चीनमधील अनेक फुटीरतवादी नेते भारतात होणा-या या परिषदेसाठी येणार आहेत. चीनमध्ये लोकशाही स्थापित करण्याबद्दल ते चर्चा करणार आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात आणलेला प्रस्ताव चीनमुळे मंजूर होऊ शकला नव्हता.
त्यानंतर भारताने चीनचे फुटीरतवादी नेते डोल्कन इसा यांना व्हिसा मंजूर करुन चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले होते. युघूर या चीनमधील मुस्लिम बहुल भागातील नेते डोल्कन इसा यांना चीनने दहशतवादी घोषित करुन त्यांना इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. चीनच्या मुस्लिम बहुल युघूर भागामध्ये चीन विरोधात मोठया प्रमाणावर असंतोष आहे.