युक्रेनविरोधातील युद्धामुळे रशियावर जगभरातील अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत भारताने अजूनही रशियाकडून स्वस्त तेल खरेदी सुरुच ठेवली आहे. अनेक पाश्चात्य देशांनी भारताच्या या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे, पण भारत मागे हटायला तयार नाही. यातच मीडिया रिपोर्ट्समधून एक मोठी माहिती समोर आली आहे. रशियाच्या प्रचंड सूटनंतरदेखील भारताची प्रति बॅरल फक्त $ 2 ची बचत होत आहे.
चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा जगातील तेलाचा तिसरा सर्वात मोठा खरेदी देश आहे. स्वस्त रशियन तेलाने भारताच्या तेलावरील सरासरी खर्च कमी केला आहे. परंतु या नऊ महिन्यांच्या कालावधीत भारताने प्रति बॅरलमध्ये केवळ 2 डॉलर्सची बचत केली आहे. अमेरिकेसह पाश्चात्य देशांचे रशियावर आर्थिक निर्बंध असूनही भारत रशियाकडून सवलतीच्या किंमती मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनीही भारतावर नाराजी व्यक्त केली.
रिपोर्टनुसार, जगातील इतर देशांकडून येणाऱ्या तेलाची स्वस्त रशियन तेलाशी तुलना केल्यास दिसून येते की, या नऊ महिन्यांत भारताने रशियामधून खरेदी केलेल्या तेलावर प्रति बॅरल केवळ 2 डॉलर्सची बचत केली आहे. एप्रिल-डिसेंबर दरम्यान भारतात प्रति बॅरल तेलाची किंमत सरासरी 99.2 होती. जर भारताने रशियाकडून तेल विकत घेतले नाही तर ही सरासरी किंमत किंचित वाढली असती. या कालावधीत भारताने एकूण 126.51 अब्ज डॉलर्सचे तेल विकत घेतले. त्यापैकी सुमारे 22 अब्ज डॉलर्सचे तेल रशियाकडून विकत घेतले आहे.
एप्रिल-डिसेंबर दरम्यान भारतासाठी रशियन कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल $ 90.9 होती. इतर देशांच्या सरासरी किंमतीपेक्षा सुमारे 10.3 डॉलर कमी आहे. तेल उद्योगातील अंतर्गत स्त्रोतांनुसार, रशियन तेलासाठी मालवाहतूक आणि विम्याची किंमत इतर पुरवठादारांपेक्षा तुलनेने जास्त आहे. यामुळे 10 टक्के सूटच्या तुलनेत बचत केवळ 2 टक्के आहे. युक्रेनच्या युद्धामुळे रशियाला मोठा फटका बसला आहे. यामुळे रशियन तेल वाहून नेण्यासाठी मालवाहतूक आणि विमा खर्चातही लक्षणीय वाढ झाली आहे.
एप्रिल-डिसेंबरमध्ये भारताने एकूण 1.27 अब्ज बॅरल तेल विकत घेतले. त्यापैकी भारताने रशियाकडून सुमारे 19 टक्के तेल विकत घेतले. भारताचा किरकोळ तेल पुरवठादार असलेल्या रशियाने गेल्या नऊ महिन्यांत सौदी अरेबिया आणि इराकसारख्या उच्च तेल निर्यात करणार्या देशांना मागे टाकले. अहवालानुसार सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान भारताने रशियाकडून सर्वाधिक तेल विकत घेतले आहे.