ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - भारत लवकरच रशियाबरोबर अत्याधुनिक लढाऊ विमान निर्मितीच्या रखडलेल्या प्रकल्पावर चर्चा सुरु करणार आहे. यामध्ये पाचव्या जनरेशनचा लढाऊ विमान प्रकल्प तसेच सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान 'सुपर सुखोई' मध्ये बदलण्याचा प्रस्ताव आहे. सुखोई-टी ५० हे रशियाचे पाचव्या जनरेशनचे लढाऊ विमान असून, सध्या या विमानाचे प्रारुप तयार आहे.
भारत आणि रशियामध्ये संयुक्तपणे मिळून या विमानाची निर्मिती करण्याचा करार झाला आहे. पाचव्या जनरेशनच्या लढाऊ विमानांचे वैशिष्टय म्हणजे हे विमान रडारला सापडत नाही. सध्या अमेरिकेकडे पाचव्या जनरेशचे लढाऊ विमान आहे. अलीकडेच जपाननेही अशा विमानाची चाचणी केली होती.
भारत-रशियामध्ये २००७ मध्ये पाचव्या जनरेशनच्या लढाऊ विमानांच्या निर्मितीचा करार झाला होता. ही विमाने प्रत्यक्षात आल्यानंतर भारतीय वायू दलाची ताकत कैक पटीने वाढेल. भारत आणि फ्रान्समध्ये लवकरच राफेल फायटर विमान खरेदीचा करार होऊ शकतो. या करारानुसार भारत ७.८ अब्ज युरो मोजून फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने विकत घेणार आहे.
पण या व्यवहाराने भारतीय वायूदलाची गरज पूर्ण होणार नाही. भारतीय वायूदलाची सध्या ३३ स्क्वाड्रन असून, त्यात मिग-२१ आणि मिग-२७ निवृत्तीच्या वाटेवर आहेत. चीन आणि पाकिस्तानचा धोका लक्षात घेता भारताकडे ४२ स्क्वाड्रन सज्ज असणे आवश्यक आहे. अमेरिकेत एफ-१८, एफ-१६ विमानांचे उत्पादन करणारी कंपनी स्वीडनच्या ग्रिपेन कंपनीने मेक इन इंडिया अंतर्गत भारतात उत्पादन करण्यात स्वारस्य दाखवले आहे.