नवी दिल्ली : प्रख्यात अमेरिकी कंपनी गुगल ‘भारत सेव्ह्ज’ या नावाची वेबसाईट तयार करणार आहे. या वेबसाईटवर भारतातील वित्तीय नियोजनाची सर्व प्रकारची माहिती असेल. भारतात गुगलचा मोठा विस्तार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आपली वेबसाईट कंपनी भारत सरकारच्या वित्तीय जन-धनसारख्या योजनांशी जोडणार आहे. २0१४ रोजी सुरू करण्यात आलेल्या जन-धन योजनेत २४ कोटी नवी बँक खाती उघडण्यात आली आहेत, तसेच ४१ हजार कोटी रुपये बँकांत जमा झाले आहेत. वित्त मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यासंदर्भात गुगल सध्या सरकारशी चर्चा करीत आहे. कंपनीच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे वित्तीय साक्षरता निर्माण होण्यास मदत होईल, तसेच वित्तीय योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांच्या व्यापक वित्तीय दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या अनेक संस्था आणि औद्योगिक संघटना या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी एकत्र येत आहेत. वित्तीय साक्षरता आणि जाणीव जागृती मोहीम या योजनेचा भागच असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गुगल विकसित करणार ‘भारत सेव्ह्ज’ वेबसाईट
By admin | Published: September 07, 2016 4:17 AM