इंडिया आघाडीत बिघाडी होणार? जागा वाटपाबाबत 'या' सहा राज्यात मोठा गुंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 06:15 PM2023-12-20T18:15:56+5:302023-12-20T18:16:29+5:30
I.N.D.I.A. Alliance: इंडिया आघाडीत बऱ्याच मुद्द्यांवर एकमत झाले आहे, पण अद्याप जागा वाटपाबाबत ठोस माहिती समोर आली नाही.
I.N.D.I.A. Seat Sharing Formula: लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी INDIA आघाडी स्थापन केली, या आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली असून, लवकरात लवकर यावर निर्णय होणार आहे. जानेवारी महिन्यात बहुतांश राज्यांमध्ये जागा वाटपाचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
जागावाटपाबाबत राज्य पातळीवर चर्चा होणार आहे. बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यात बोलणी होणार आहेत. आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांची समितीही स्थापन केली आहे. मात्र, जागावाटप वाटते तितके सोपे काम नाही. अशी पाच ते सहा राज्ये आहेत, जिथे जागावाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे.
दिल्ली-पंजाब
दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये सर्वात मोठा गोंधळ सुरू आहे. काँग्रेस नेतृत्व आणि अरविंद केजरीवाल एकत्र दिसत असले तरी, दोन्ही पक्षांतील राज्य नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. काँग्रेस या दोन्ही राज्यात जागा मागू शकते, तर आम आदमी पार्टी गुजरात, गोवा आणि हरियाणामध्येही काँग्रेसकडे जागा मागू शकते. त्यामुळे या दोन राज्यांबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे असेल.
उत्तर प्रदेश
सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष काँग्रेससाठी किती जागा सोडणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यूपी काँग्रेसच्या काही नेत्यांना इंडिया आघाडीत बसपाचा समावेश करायचा आहे, परंतु समाजवादी पक्षाने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सपासोबत युती करून यूपीमधील 80 पैकी 20 जागांवर काँग्रेसचे लक्ष आहे.
बिहार
बिहारमध्ये काँग्रेसची आरजेडी, जेडीयू आणि डाव्या पक्षांसोबत युती आहे. येथील 40 जागांच्या संदर्भात जेडीयू आणि आरजेडी यांच्यातील जागा निवडीबाबत चित्र स्पष्ट नाही. दोन्ही बडे पक्ष प्रत्येकी 15 जागांवर लढतील असे मानले जात आहे. सीपीआय-एमएल आणि सीपीआयने अधिक जागांसाठी दबाव आणला, तर काँग्रेसला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागेल.
पश्चिम बंगाल
बंगालमध्ये डावे पक्ष आणि ममता एकत्र निवडणूक लढवणे अशक्य आहे. अशा स्थितीत डाव्या पक्षांसोबतची युती सुरू ठेवायची की टीएमसीशी हातमिळवणी करायची, हा काँग्रेससमोरचा पेच आहे. दोन्ही पक्षांना काँग्रेसला बंगालमध्ये पाय पसरू द्यायचे नाहीत. अशा स्थितीत बंगालमध्ये काँग्रेसच्या वाट्याला पाच-सात जागांच्या पुढे मिळणे शक्य नाही.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील, असे वाटत असले तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार माघार घेणार नाहीत. इथले तिन्ही पक्ष 48 जागा समान वाटून घेऊ शकतात.
तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि झारखंडमध्ये जेएमएम यांच्याशी काँग्रेसच्या युतीमध्ये विशेष गुंतागुंत नाही. याशिवाय बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसची भाजपशी थेट स्पर्धा आहे. अशा सर्व गुंतागूंतीच्या परिस्थितीत नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.