नवी दिल्ली- भारतीय अधिकाऱ्याला विमानातून उतरवणाच्या घटनेची नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी गंभीर दखल घेतली आहे. ब्रिटिश एअरवेजने भारतीय अधिकाऱ्यास व त्याच्या कुटुंबाला 23 जुलै रोजी विमानातून बाहेर काढले होते. यासंदर्भात प्रभू यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये प्रभू म्हणतात, '' मी या प्रकरणात ब्रिटिश एअरवेजकडून सखोल अहवाल मागवण्याचे आदेश डीजीसीएला दिले आहेत.''
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातील सहसचिव पदावर कार्यरत असणाऱ्या ए.पी.पाठक यांनी ब्रिटिश एअरवेजने आपल्याला वंशभेदाची वागणूक देऊन विमानाबाहेर काढले अशी तक्रार नागरी उड्डाण मंत्रालय आणि परराष्ट्र विभागाकडे केली आहे. या घटनेबाबत माहिती देताना पाठक म्हणाले, 'आमचे कुटुंब लंडन ते बर्लिन असा ब्रिटिश एअरवेजमधून प्रवास करत होते. आम्ही प्रवास करत असताना आमचा तीन वर्षांचा मुलगा रडू लागला, फ्लाइट अटेंडंटने त्याला थांबायला सांगितले आणि जर रडणे थांबवले नाही तर विमानातून उतरवू अशी धमकी दिली. काहीवेळ तो शांत झालेला नसल्याचे लक्षात आल्यावर आम्हाला विमानातून उतरवले गेले.'
ते पुढे म्हणाले, माझ्या मुलाची जागा खिडकीशेजारी होती. त्याला शांत करण्यासाठी तेथे माझी पत्नी बसली होती. तरीही तेथे जाऊन माझ्यामुलाला अटेंडंटने खडसावले. विमान धावपट्टीकडे जाऊ लागल्यावर कर्मचाऱ्यांपैकी एकाने अपशब्द वापरुन जर तू शांत राहिला नाहीस तर खिडकीतून बाहेर फेकेन अशी धमकी दिली व नंतर आम्हाला उतरवण्यात आले. यासंदर्भात तक्रार करुनही ब्रिटिश एअरवेजच्या व्यवस्थापनाने काहीही कारवाई केली नाही. यासर्व प्रकारामुळे पाठक यांना लंडनमध्येच एक रात्र राहावे लागले आणि बर्लिनला जाण्यासाठी खर्च करावा लागला.