नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत भारत पूर्णत: आत्मनिर्भर असून, भारत एक नव्हे तर दोन लसींसह मानवतेच्या सुरक्षेसाठी तयार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
१६ व्या अनिवासी भारतीय दिन परिषदेचे उद्घाटन करताना मोदी यांनी सांगितले की, आपण विदेशात जेथे जेथे राहत आहात, तेथून देशाला मोठे योगदान दिले आहे. पीएम केयर्स फंडास आपण दिलेल्या योगदानामुळे भारतीय आरोग्य सेवा मजबूत होत आहे. कोरोना काळात आज भारत हा सर्वाधिक कमी मृत्यूदर आणि सर्वाधिक बरे होण्याचा दर असलेला देश आहे. आज भारताकडे एक नव्हे, तर दोन ‘मेड इन इंडिया’ कोरोना लसी आहेत. या लसींसह भारत मानवतेच्या सुरक्षेसाठी सिद्ध झाला आहे. मोदी यांनी म्हटले की, आपले सामर्थ्य आणि क्षमता काय आहे, हे भारताने साथीच्या या काळात दाखवून दिले आहे. एवढा मोठा देश एकजुटीने उभा राहिला आहे, असे दुसरे उदाहरण जगात नाही. जगभरात अडकलेल्या ४५ लाख भारतीयांना ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत भारतात आणण्यात आले.
मातीचे संस्कारमोदी यांनी म्हटले की, आज जगाचा प्रत्येक कानाकोपरा इंटरनेटने जोडला गेलेला असेलही, पण आपले सगळ्यांचे मन भारत मातेशी जोडले गेले आहे. एकमेकांबद्दलच्या आपलेपणाने जोडले गेले आहे. मावळते वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक राहिले. या आव्हानाच्या काळात जगभरात पसरलेल्या भारतीयांनी जे कर्तव्य बजावले, ते सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. हेच तर आमच्या मातीचे संस्कार आहेत.