नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने एलओसी ओलांडली. मात्र, आम्ही त्यांना हुसकावून लावल्याचा पोकळ दावा पाकने केला आहे. भारतीय सैन्याने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताच्या मिराज जेट फायटरची 10 विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे.
काश्मीरमध्ये तणाव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवानांच्या 100 तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. शिवाय पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने राजस्थानमध्ये सीमारेषेनजीक प्रात्यक्षिके केली होती. पाकिस्तान आणि भारताकडून दोन्ही बाजुंनी एकमेकांना घेरण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी दिली होती. यावर पाकिस्तानचे पाणी अडविण्याचा इशारा नितीन गडकरी यांनी दिला होता.
अशातच काल पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तान आगळीक करणे सोडत नसून आज पाकिस्तान लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवर भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे.