नवी दिल्ली : नेपाळसह भारतात शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह पूर्व व उत्तर भारतातील अनेक भागाला उच्च तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.९ एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते. दरम्यान, देशात शनिवारी आलेल्या भूकंपात आतापर्यंत ६२ बळी गेले असून २५९ जण जखमी झाले आहेत. बिहारात रविवारी भूकंपबळींची संख्या वाढून ४६ वर पोहोचली. राज्याच्या पूर्व चंपारण्य भागात सर्वाधिक आठ, तर सीतामढी आणि दरभंगामध्ये प्रत्येक सहा जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बळींची संख्या १३ झाली आहे.पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील अनेक राज्यांत दुपारी १२.४२ मिनिटाला सुमारे १० मिनिटे भूकंपाचे हादरे जाणवले. यामुळे लोकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली आणि लोक आपली घरे व कार्यालयातून बाहेर पडून रस्त्यांवर आली. या ताज्या धक्क्यामुळे देशात कुठेही कुठल्याही प्राणहानीचे वृत्त नाही.बिहारातही ६.७ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. कालच्या भूकंपात बिहारातील ४२ लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आजच्या ताज्या धक्क्यांनी सर्वत्र दहशत पसरली. लोक तात्काळ आपल्या घर व कार्यालयांतून रस्त्यांवर आले. उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर, संत कबीरनगर, फैजाबाद, बहराईच, बलिया, महाराजगंज, कुशीनगर, अमेठी, उन्नाव आदी अनेक जिल्ह्यात १२ वाजून ४३ मिनिटाला सुमारे ४५ सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशात शनिवारी बहुतांश जिल्हे भूकंपाने हादरले होते. यात १३ ठार तर ४० पेक्षा अधिक जखमी झाले होते. तथापि, रविवारच्या या ताज्या धक्क्यानंतर कुठल्याही हानीचे वृत्त नाही. राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून दोन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. चंदीगडवरून प्राप्त माहितीनुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोलकातात बेहाला, गरिया, लेकटाऊन, साल्ट लेक आदी भागांत भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपानंतर मेट्रोसेवा अस्थायी रूपात काही वेळ रोखण्यात आली. मुख्यमंत्रीही ‘हादरले’बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी भूकंपासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक बोलवली होती. याचदरम्यान अचानक भूकंपाने जमीन हादरली. यानंतर नितीशकुमार आणि मंत्रिमंडळाचे अन्य सदस्य व अधिकारी बैठकीच्या ठिकाणावरून बाहेर पडले.