ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - संयुक्त राष्ट्रामधील आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात खोडा घातल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारतावर उलटा आरोप केला आहे. दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या नावाखाली भारत राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.
दहशतवादाचा सामना करताना दुटप्पी भूमिका असू नये, भारत दहशतवादाला प्रत्युत्तर देण्याच्या नावाखील राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो असा आरोप चीनचे उपपरराष्ट्रमंत्री ली बावोडाँग यांनी केला. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर विरोधातील प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर चीनने हे वक्तव्य केले.
भारताने मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्यासाठी मांडलेला प्रस्ताव चीनने आपल्या विशेषअधिकाराचा वापर करुन रोखून धरला आहे. शनिवारी चीनने हा प्रस्ताव आणखी तीन महिन्यांसाठी रोखून धरला. या आठवडयात 15-16 ऑक्टोंबरला गोव्यात होणा-या ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौ-यावर येत आहेत.