नवी दिल्ली : भारतामध्ये असलेले कोळशाचे मोठे साठे आणि व्यापारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या कोळसा खाणी यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा कोळसा निर्यातदार देश ठरावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.देशातील ४१ कोळसा क्षेत्रांच्या व्हर्चुअल लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. येत्या ५ ते ७ वर्षात कोळसा खाणीच्या क्षेत्रात ३३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे देश कोळश्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.कोळसा खाणीच्या क्षेत्रांच्या लिलावाची सुरू झालेली प्रक्रिया म्हणजे गेली अनेक दशके ‘लॉक’ असलेले हे क्षेत्र आता ‘अनलॉक’ होण्याला प्रारंभ झाला आहे. या क्षेत्रामध्ये आता खासगी संस्था आणि व्यक्तींना उतरता येणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या साथीने देशाला स्वयंपूर्ण असणे कसे गरजेचे आहे याचा धडा दिल्याचे त्यांनी सांगितले.भारतामध्ये जगातील चौथ्या क्रमांकाचे कोळसा साठे आहेत. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहोत असे असले तरी भारत कोळशाची निर्यात करीत नाही. यामध्ये बदल होणे अपेक्षित असून, भारत हा जगातील सर्वात मोठा कोळसा निर्यातदार देश बनण्याची गरज असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या क्षेत्रातील गुंतवणुकीची माहिती दिली.२० हजार कोटींची गुंतवणूकसन २०३० पर्यंत देशातील १०० दशलक्ष टन कोळशापासून वीज उत्पादन करण्याचा सरकारचा मानस असून, त्यासाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यासाठी चार प्रकल्पांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
भारत सर्वात मोठा कोळसा निर्यातदार देश व्हावा - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:31 AM