ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.27- उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याचा विचार भारताकडून सुरू आहे. दरम्यान ही कारवाई होण्याआधीच पाकिस्ताननं याचा धसका घेतल्याचे दिसत आहे.
भारत अशा प्रकारे एकाकी हा करार रद्द करू शकत नाही. जर भारतानं हा करार रद्द केला तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू, असं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ यांनी म्हटले आहे. कारगिल आणि सियाचेन युद्धादरम्यान देखील हा करार रद्द केला गेला नव्हता, असेही अजिझ यांनी म्हटले आहे.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू पाणीवाटप करारासंदर्भात अधिका-यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही, असं वक्तव्य करत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानची कोंडी करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.