ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये ज्या प्रमाणे पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करुन बांगलादेशची निर्मिती केली. त्याप्रमाणे भारताने आता बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे असे विधान बलुचिस्तानातील महिला नेत्या नाएल कादरी बलोच यांनी केले आहे.
भारताने आपल्या बलुचिस्तान संदर्भातील धोरणात बदल करावा यासाठी जनमत तयार करण्यासाठी त्यांचा भारतातील एका शहरातून दुस-या शहरात प्रवास सुरु आहे. यापूर्वीही बलुचिस्तानातील नेत्यांनी अशी मागणी केली आहे. पण भारताने या मागणीला फारसे गांर्भीयाने घेतले नाही.
पाकिस्तानने अनेकदा भारतावर बलुचिस्तानात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. नाएला बलुच नेत्या आहेत ज्यांना भारतात येऊन स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष बलुचिस्तानचा मुद्या मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत आणि जगाने बलुचिस्तानच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करुन बलुचि जनतेवर पाकिस्तानकडून सुरु असलेला अत्याचार थांबवावा.
अन्यथा बलुच बंडखोरांना पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारावे लागेल. आतापर्यंत बलुची जनतेने पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. पाकिस्तानकडून हल्ले होत असताना आम्ही फक्त आमचे संरक्षण करत आहोत. पण आम्ही अजून किती काळ थांबायचे ? हे युद्ध पाकिस्तानात सुरु होईल असा इशारा त्यांनी दिला. नाएला आणि तिचे कुटुंबिय कॅनडामध्ये विजनवासात रहात आहेत.